मनोरंजनमहाराष्ट्रयोजनाव्यवसाय

शेतशिवारातील रस्ते होणार टकाटक, ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.. असा होणार फायदा

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात शेत-पाणंद रस्त्यांची गरज आहे. रस्ते नसल्याने शेतातील पीक बाहेर काढताना, शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते. बऱ्याचदा शेत-पाणंद रस्त्यावरुन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वादविवादही होत असतात.

शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गावाेगावचे शेतरस्ते, पाणंद रस्ते टकाटक करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ या नावाने महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यात दोन लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेच्या (मनरेगा) व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ ही संकल्पना राबविण्यात येते.

राज्यात सध्या पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येते. या योजनेतील अडचणी दूर करून रस्त्यांच्या कामांसाठी ‘मनरेगा’मधून आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयोचे एकत्रीकरण करण्यात आलेय.

प्रत्येक गावात सरासरी ५ किलोमीटरच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजने’तून सर्व शेतांपर्यंत दर्जेदार, बारमाही वापरता येतील, असे शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार केले जाणार आहेत. राज्यात सुमारे २ लाख किलोमीटर रस्त्यांचे काम केले जाणार आहे.

बैठकीतील अन्य निर्णय
दरम्यान, जालना येथे मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळेस वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले.

सांगली जिल्ह्य़ातील वाकुर्डे (ता. शिराळा) येथील उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

संबंधित बातम्या:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button