Pearl Farming information Marathi: गडचिरोलीतल्या तरुणाने मोत्यांच्या शेतीतून कमावले लाखो रुपये, कशी करतात ही शेती?
Pearl Farming information Marathi: लहानपणी कधी तुम्ही नदीतले शंख-शिंपले गोळा केले आहेत का? शिंपले गोळा करायचे आणि त्यात मोती तयार होतील म्हणून वाट पाहायची, असं आपण लहानपणी कित्येकवेळा केलं असेल. पण पुढे चालून हेच तुमचे करिअर होईल, असं कुणी सांगितलं असतं तर त्यावर तुमचा विश्वास बसला असता का?
अगदी असंच काहीसं झालंय, गडचिरोली जिल्ह्यातल्या संजय गंडाटे या 38 वर्षीय तरुणासोबत. वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने मोत्यांची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज तो लाखो रुपये कमावत आहे. हे कसं घडलं याची कहाणी त्याने मला सांगितली.
गडचिरोलीपासून पाच सात किलोमीटरवर असलेली पारडी कुपी हे वैनगंगेच्या तीरावर असलेलं सुंदर गाव आहे. पाहावं तिकडे हिरवळ आणि भाताची शेती हेच या गावचं वैभव.
याच गावात आपण काहीतरी करावं या ईर्ष्येने संजय पेटून उठला. पण नेमकं काय करणार याची दिशा काही मिळत नव्हती.
इंटरनेटवरून मिळवली माहिती
संजयने इंटरनेटवरून एक एक गोष्ट शोधायचा प्रयत्न केला पण हाती नेमकं काही येत नव्हतं. एकेदिवशी त्याने इंटरनेटवर मोत्यांच्या शेतीचा व्हीडिओ पाहिला.
लहानपणी आपण देखील असे शिंपले गोळा करत होतो याची आठवण जागी झाली आणि त्याने मोत्यांच्या शेतीचा निर्णय घेतला. पण हे म्हणावं तितकं सोपं नव्हतं.

कारण मोत्यांची शेती करण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी नव्हता. कुणी मार्गदर्शन करणारा गुरू देखील नव्हता. तेव्हा त्याला इंटरनेटवरूनच कळलं की गडचिरोलीच्या कृषी केंद्रात आपल्याला मदत मिळू शकेल.
मग काय त्याने कृषीकेंद्र गाठलं. तिथे त्याची ओळख प्राध्यापक कऱ्हाडे यांच्याशी झाले. मला मोत्यांची शेती करायची आहे असे तो आत्मविश्वासाने म्हणाला. कऱ्हाडे सरांनी त्याला सर्वतोपरीने मदत केली.
कऱ्हाडे सरांकडून मिळालेल्या ज्ञानाची पुरचुंडी गाठीशी बांधून तो पारडीमध्ये पोहोचला खरा पण आता अडचण तर समोर होती. त्यांनी जे सांगितलं ते तर थेअरी होती पण आता प्रॅक्टिकल कसं करणार.
मग काय त्याने एकावेळी एक पाऊल उचलण्यास सुरुवात केली. रोज सकाळी उठायचं आणि नदीच्या नितळ स्वच्छ पाण्यातील शिंपले गोळा करून आणायचे.

त्याचे हे काम पाहून अनेकांना वाटू लागले की हा नेमकं काय करतोय, काहींनी दुर्लक्ष केलं तर काहींना वाटलं याला तर लहान पोरांसारखा नाद लागलाय. पण त्याने आपले काम नेटाने सुरू ठेवले. घरी कृत्रिम टॅंक उभा केला.
आजूबाजूला वेली, झाडी झुडपं लावली. सर्व काही केलं आणि सहा-सात महिन्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण जे काही केलं आहे त्यामुळे मोती तयार होणार नाहीत.
‘अपयश ही यशाची पहिली पायरी’
अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं याआधी त्याने कित्येक वेळा ऐकलं होतं. पण इतकी मेहनत घेऊन सर्व पाण्यात गेल्यावर जो आघात मनावर होतो तो पचवणं खरंच अवघड असल्याचं तो सांगतो.
पुन्हा त्याने जोमाने तयारी सुरू केली. यावेळी देखील त्याच्या पदरी निराशाच आली. पण या अनुभवाने मात्र तो शहाणा झाला. यावेळी निदान आपण काय चुका केल्या आणि काय टाळता येईल हे त्याच्या ध्यानात आले. त्याने तिसऱ्यांदा प्रयत्न केला. आणि काय नवल, यावेळी खरंच मोती फुलले. किमान सात आठ लाख रुपये तरी येतील असं त्याला वाटलं आणि त्याच्याकडे चोरी झाली.
बचत करून गाठीशी असलेला पैसा त्याने या व्यवसायात गुंतवला होता. या प्रसंगाबद्दल संजय सांगतो, ‘मला स्वप्नात देखील वाटल नव्हतं की माझे मोती कुणीतरी चोरून नेतील, पण हे घडलं, या मोत्यांची किंमत 7 ते 8 लाख इतकी होती, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला पण मी खचलो नाही. माझा प्रयोग यशस्वी झाला याचे समाधान देखील होते. म्हणून मी पुन्हा जोमाने कामाला लागलो.’

चौथ्यांदा सर्व गोष्टी जुळून आल्या आणि व्यावसायिकदृष्ट्या तो त्यात यशस्वी झाला. त्याने तयार केलेले मोती हैदराबाद, सुरत या ठिकाणी गेले त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.
या अनुभवातून आपण काय शिकलो हे सांगताना तो म्हणतो की, सुरुवातीला कमी गुंतवणूक करायची प्रयोग यशस्वी झाल्यास मग मोठी गुंतवणूक करायची असे मी आधीच ठरवले होते, मोत्याच्या उत्पादनात गुंतवणूकीच्या 9 पट अधिक नफा असतो.
पण त्यात जोखीमही तेव्हढीच असते, ती घ्यायची मी ठरवलं आणि पुढचा प्रवास सुरू केला.
जेव्हा माझ्या या प्रयोगाबद्दल लोकांना कळले तर त्यांनी आम्हाला देखील प्रशिक्षण द्या अशी मागणी केली. त्यांना मी प्रशिक्षण देखील देतो. आतापर्यंत 30-40 जण मोत्यांच्या शेतीबाबत माझ्याकडून शिकून गेले आहेत असं संजय सांगतो.
मोती उत्पादनाची प्रक्रिया कशी असते याबाबत संजयने तपशीलाने माहिती दिली.
मोती उत्पादनाची प्रक्रिया
मोत्याच्या उत्पदनातून लाखोचे उत्पादन घेणे तितके सोपे नाही. एकूण उत्पादन प्रक्रियेसंदर्भात संजय सांगतो की, मोतीचे उत्पादन घेण्याकरिता सर्वात आधी जिवंत शिंपले मिळविणे गरजेचे आहे.
यासाठी हे शिंपले जवळील नदीतून शोधल्यानंतर घरी बनविलेल्या टॅंकमध्ये दोन ते तीन दिवस टाकण्यात येतात. टॅंक पाच बाय दहा आकाराचे असून जमीनीपासून जवळवापास 8 ते 10 फूट खोल व वर 3 ते 4 फूट उंच बांधण्यात आले आहे.

अवतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडे, वेली लावण्यात आले आहे. त्यामुळे मोत्यासाठी आवश्यक हिरवळ कायम राखण्यात उपयोगी ठरते. टॅंकमध्ये काही दिवस ठेवल्यानंतर त्या शिंपल्यांची शस्त्रक्रिया केली जाते.
मग त्यात जंगली वनस्पतींपासून बनविण्यात आलेले बीज सोडण्यात येतात. बिज बनविण्याची पद्धत संजयने अनेक प्रयोगानंतर शिकली. त्यानंतर ते शिंपले परत टॅंकमध्ये सोडले जाते.
पाण्यामध्ये वाढलेली शेवाळ व जनावरांची विष्टा या शिंपल्यांना अन्न म्हणून दिल्या जाते. विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरण राखणे अधिक फायद्याचे असल्याने कृत्रिम साधनांचा वापर टळाण्यात येतो. जवळपास दीड ते दोन वर्षांनंतर या शिंपल्यांची पूर्ण वाढ होत असते. त्यानंतर यातील मोती बाहेर काढून ठोक किंवा किरकोळ मार्केटमध्ये विक्री करण्यात येते.
अशी माहिती संजयने दिली.
देवीदेवतांच्या आकारच्या मोतीला मोठी मागणी
केवळ साधे मोतीचे उत्पादन घेताना विविध आकाराचे मोती तयार करता येतील का याची मी चाचपणी केली, तसे प्रयत्न चालू केले. यातून देविदेवतांच्या आकाराचे मोती तयार झाले.

या मोतींना बाजारात मोठी मागणी आहे. साध्या मोतीच्या तुलनेत याला तिप्पट भाव मिळत असल्याचेही संजय सांगतो.
मोती उत्पादनात शिंपल्यांची उपलब्धता गरजेची आहे, यासाठी मी रोज सकाळी गावाजवळील नदीतून जिवंत शिंपले गोळा करून घरी आणायचो, त्यावर शस्त्रक्रिया करून मोत्यांचे बीजकण आत सोडायचे आणि साधारण दीड वर्ष देखरेख ठेवायची.
असा नित्यक्रम पाळल्यानंतर जवळपास दीड वर्षात परिपक्व मोती हातात येतो. अन्न म्हणून जनावरांच्या विष्टेचा वापर करतो. विशेष म्हणजे हे शिंपले जिवंत असतात. त्यामुळे नियमित देखरेख ठेवावीच लागते. अन्यथा नुकसान होण्याचा धोका असल्याचेही संजय सांगतो.
बाराशे रूपये कॅरेटने विकला जातो
सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांची मोठी बाजारपेठ आहे. संजयने उत्पादन घेतलेल्या मोत्यांची गुणवत्ता उच्चप्रतिची असल्याने त्याला बाराशे रुपये कॅरेट इतकी किंमत मिळते. मोत्यांचे वजन कॅरेटमध्ये मोजतात.

साधारण एका शिंपल्यात दोन मोती असतात. त्याचा एकूण खर्च 70 रूपये इतका येतो. त्यातून 3 ते 5 हजारापर्यंत उत्पन्न मिळतं. एका हंगामात जवळपास 5 हजार शिंपले टॅंकमध्ये टाकल्या जातात. योग्य देखरेख ठेवल्यास त्यातील जवळपास 4 हजार वाचतात.
कुठेही चूक झाल्यास शिंपल्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत नुकसान देखील होवू शकते त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखीम देखील असल्याचेही संजयने सांगितले.
आधुनिक शेतीच पर्याय
मोत्यांच्या शेतीसोबत संजय आधुनिक शेती बद्दल अधिक जागरूक आहे. ‘या भागात पारंपारिक भात पिकाचे उत्पादन घेतल्या जाते मात्र, यातून पाहिजे तेव्हढे उत्पन्न होत नाही.
म्हणून माझ्या 1 एकर शेतात मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड केली आहे. सोबतच फळबाग व भाजीपाला देखील पिकवितो. पारंपारिक शेती बद्दलचे संजचे मत वेगळे आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता मिळवायची असल्यास आधुनिक शेतीच हाच पर्याय असल्याचेही तो सांगतो.
हे वाचलंत का?
- 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?
- तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?
सौजन्य - बीबीसी मराठी