शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती…! वीज कंपनीकडून ऊस जळालाय, मग अशी मिळवा नुकसानभरपाई…
आम्ही कास्तकार ऑनलाईन: ऊस शेती ही पाण्यावर आधारित असते.अलीकडच्या काळात उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पिक असले तरी उत्पादनामध्ये अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आता नव्यानेच वीजेच्या खांबावरील किंवा ट्रान्स्फॉर्मरमधील घोटाळ्यांमुळे ऊस जळीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. या नुकसानीच्या झळा ह्या शेतकऱ्यांनाच सहन कराव्या लागतात. केवळ नुकसानभरपाई मिळवावी कशी हे माहित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. महावितरणकडे कागदपत्रांची पूर्तता करायची कशी आणि नुकसानभरपाई मिळवायची कशी याबद्दल अनेक शेतकरी हे अनभिज्ञ असतात. मात्र, हीच नुकसानभरपाई मिळवण्यासाठी काय करावे लागते याची माहिती आपण घेणार आहोत.
कोणत्या कागदपत्रांची करावी लागते पूर्तता
— महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळाला असेल तर शेतकऱ्याला महावितरणच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे ही अर्जासोबत जमा करावी लागतात.
– यामध्ये मागील तीन वर्षाचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊस जळाला आहे त्याचे फोटो, ऊसाबरोबरच त्या क्षेत्रातील ठिंबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य हे या घटनेत जळाले असेल तर त्याचे बील. तर साखर कारखान्यांची मागच्या तीन वर्षांची बीलंही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.
— शिवाय किती एकरावरचे नुकसान झाले आहे यासंदर्भात कृषी विभागाचा अहवाल. यामध्ये अंदाजे किती रुपयांपर्यंतचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे याचा उल्लेख असणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्जासोबत जोडून दाखल करावी लागणार आहेत.
महावितरणची भूमिका काय?
– शेतकऱ्याचा अर्ज दाखल झाल्यानंतर महावितरणकडूनही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जातो.
– यासाठी एका निरिक्षकाचीच नेमणूक करण्यात आलेली असते. जिल्हानिहाय अशा निरिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली असते.
– चेकलिस्ट, फॉर्म अ, फॉर्म क्र. 2, उपविभागीय अधिकाऱ्यांची टीपणी, शाखा अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्याचा जबाब, स्केच, विद्युत निरीक्षकाचे पत्र, उपविभागीय अधिकाऱ्यांची टीपणी, कारवाई अहवालाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांची टीपणी. प्रत्यक्ष पाहणी करुन महावितरणचे अधिकारी हा अहवाल अधिक्षक अभियंता यांच्याकडे सादर करतात.
– सर्व प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा होतो.
केवळ महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच अशा घटना घडतात असे नाही. तर कधी बांधावरीत तण पेटवून दिल्याने किंवा अन्य कारणांमुळेही ऊस जळीताच्या घटना घडतात. मात्र, अशांमध्ये नुकसानभरापाईचा मुद्दाच येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनीही उभे पिक शेतात असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
संदर्भ : टीव्ही ९